लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तक्रार मागे घेण्यासाठी एकाने अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. या प्रकरणी एका तरुणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुरू संजय उर्फ बाळू कांबळे (वय २०) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन मुलीला कांबळेने फूस लावून पळवून नेले होते. त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. गेल्या वर्षी कांबळे याच्या विरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर कांबळे याच्या विरुद्ध बलात्कार, अपहरण, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात कांबळे येरवडा कारागृहात होता. जामीन मिळवून तो नुकताच बाहेर आला होता.
हेही वाचा… तापमानात वाढ आणि गारांसह पावसाची हजेरी; पुण्यात ‘यलो अलर्ट’
हेही वाचा… पुणे : पोलिसांकडे तक्रार दिल्याने गुन्हेगाराकडून एकावर कोयत्याने वार
सिंहगड रस्ता भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरी कांबळे गेला. त्या वेळी तिची आई घरात होती. मी कारागृहातून बाहेर पडलो आहे. मला कोणाची भीती नाही. तुम्ही पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार मागे घेतली नाही तर दोघींना जीवे मारून टाकू, अशी धमकी देऊन कांबळे पसार झाला. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करत आहेत.