कोरेगाव पार्क परिसरात एका तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीसह चौघांना गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांच्या पथकाकडून अटक करण्यात आली. लोहगाव भागात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून हवेत गाेळीबार करणाऱ्या आरोपींना विमानतळ पोलिसांनी पकडले.
नितीन उर्फ नट्टा मोहन म्हस्के (वय ३२), संतोष सिद्धार्थ चव्हाण (वय २७, दोघे रा. ताडीवाला रोड) या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. गुरूवारी रात्री कोरेगाव पार्क भागातील योगी पार्क सोसायटी परिसरात ही घटना घडली होती. म्हस्के आणि त्याच्या साथीदारांनी सराईत गुंड यल्लापा कोळनट्टी याच्यावर गोळीबार करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. म्हस्के पत्नीला भेटण्यासाठी बंडगार्डन रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, संजय जाधव, निखील जाधव, मोहसीन शेख, कादीर शेख यांनी त्याला पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर चव्हाणला पकडण्यात आले.
हेही वाचा: पुणे: हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याच्या संचालकांना दिल्ली पोलिसांची नोटिस
बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने मुख्य आरोपी अजय उर्फ सोन्या दोडमणी, अजय काळुराम साळुंखे उर्फ धार यांना पकडले. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा: पाठ्यपुस्तकात ‘२६/११’चा धडा घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
दरम्यान, लोहगाव भागात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना विमाननगर पोलिसांनी अटक केली. नितीन किसन सकट (वय २१), गणेश सखाराम राखपसरे (वय २१), पवन युवराज पैठणकर (वय १८ तिघे रा. राखपसरे वस्ती लोहगाव), अविनाश काळुराम मदगे (वय २२,रा. खेसे वस्ती लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश ढावरे कर्मचारी अविनाश शेवाळे, सचिन कदम, अंकुश जोगदंड, नाना कर्चे, रुपेश तोडेकर आदींनी ही कारवाई केली.