पुणे : एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार खून प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शनाचा मृतदेह १८ जून रोजी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला होता.
हेही वाचा – दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र बुधवारी उपलब्ध
दर्शनाचा खून करून हंडोरे पसार झाला होता. त्याला मुंबई परिसरातून ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. दर्शनाने विवाहास नकार दिल्याने तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरने वार करून खून केल्याची कबुली हंडोरेने दिली होती. हंडोरेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. हंडोरेच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने हंडोरेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार हंडोरेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.