लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिवाजीनगर भागातील मंगला चित्रपटगृहासमोर टोळीयुद्धातून तरुणाचा खून करुन पसार झालेल्या दोन वर्षानंतर अटक करण्यात आली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर आरोपीने पोलिसांना गुंगारा दिला होता. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पंडीत अण्णा कांबळे (वय २९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन असताना कांबळे याने एका तरुणाचा खून केला होता. यापूर्वी पिस्तूल विक्री प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.

कांबळे आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून मंगला चित्रपटगृहासमोर १५ ऑगस्ट २०१३ रोजी नितीन मोहन म्हस्के (वय ३५, रा. ताडीवाला रस्ता) याच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी १७ आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी ‘मकोका’ कारवाई केली. कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. गेले दोन वर्ष पोलीस त्याच्या मागावर होते. कांबळे हा दत्तवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस उपायु्क्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रकात सूर्यवंशी, उपनिरीक्षक अजित बडे, हवालदार रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर वलटे, अतुल साठे, सचिन जाधव, प्रवीण दडम, सुदाम तायडे, श्रीकृष्णा सांगवे यांनी ही कारवाई केली.

फरार झाल्यानंतर कांबळे गोवा, कर्नाटकात नाव बदलून वास्तव्य करत होता. तो मोबाइल वापरत नव्हता. त्यामुळे त्याचा ठावाठिकाणा लागत नव्हता. तो परराज्यात लुटमारीचे गुन्हे करायचा. नागरिकांकडील मोबाइल संच चोरून तो नातेवाईकांशी संपर्क साधत होता. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खूनाचे दोन, तसेच गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. ताडीवाला रस्ता, बंडगार्डन रस्ता, दत्तवाडी, दांडेकर पूल परिसरात तो गुन्हे करत होता.