नात्यातील महिलेकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयातून एकाचा खून करुन पसार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. पिताराम केवट (वय २३, रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. मांजरी, मूळ रा. कर्नाटक) असे खून झालेल्याचे नाव आहे.
हेही वाचा- पुणे: लग्नाचे आमिष दाखवून महिलेची १२ लाखांची फसवणूक
केवट मूळचा मध्यप्रदेशातील आहे. केवट आणि सूर्यवंशी मांजरी भागातील एका नर्सरीत काम करत होते. दोघे शेजारी राहत होते. सूर्यवंशी नात्यातील महिलेकडे वाईट नजरेने पाहत असल्याचा संशय केवटला होता. १५ नोव्हेंबर रोजी केवटने दारू पिण्याच्या बहाण्याने सूर्यवंशीला बाहेर नेले. त्याच्यावर शस्त्राने वार करुन खून केला. १७ नोव्हेंबर रोजी सूर्यवंशी मृतावस्थेत सापडला. सूर्यवंशी याचा खून करुन केवट पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला.
हेही वाचा- पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान, ३० ते ३५ जण जखमी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गु्न्हे शाखेचे निरीक्षक विश्वास डगळे, दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात केवट दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, संदीप राठोड, सुशील लोणकर, समींर पांडुळे यांनी केवटला दिल्लीत पकडले.