पिंपरी : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर फटाके फोडणाऱ्या संगणक अभियंत्याला भरधाव मोटारीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाला सोमवारी पोलिसांनी अटक केली. ही घटना रावेत येथील फॅलेसिटी सोसायटीसमोर शुक्रवारी (१ नोव्हेंबर) रात्री नऊच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोहम जयेशकुमार पटेल (वय ३८, रा. फॅलेसिटी सोसायटी, रावेत) असे मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. त्यांची पत्नी वैदेही सोहम पटेल (वय ३८) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य चंद्रकांत भोंडवे वय (२३, रा. संस्कृती हाईटस, शिंदे वस्ती, रावेत) असे ताब्यात घेतलेल्या मोटारचालकाचे नाव आहे.

हेही वाचा >>>सिंहगड रस्ता भागात सजावट साहित्याच्या गोदामात आग, रहिवासी भागात घबराट; अर्ध्या तासात आग आटोक्यात

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम हे संगणक अभियंता असून हिंजवडीतील माहिती आणि तंत्रज्ञान नगरीतील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. आई, वडील, पत्नी आणि मुलासंमवेत ते फॅलेसिटी सोसायटीतील सदनिकेत राहत होते. १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त रात्री नऊच्या सुमारास सोहम हे त्यांच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर फटाके फोडत होते. यावेळी भोंडवे बागकडून औंध-रावेत बीआरटी रस्त्याकडे जाणाऱ्या भोंडवे याच्या भरधाव मोटारीने सोहम यांना जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की सोहम अक्षरश: उडून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले. अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. स्थानिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. तसेच, सोहम यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर कारचालक भोंडवे हा घटनास्थळी न थांंबता मोटारीसह पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेत पोलिसांनी परिसरातील ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून आरोपीचा शोध लावला आणि सोमवारी त्याला अटक केली. ऐन लक्ष्मीपूजनादिवशी सोहम यांच्यावर काळाने घाला घातल्याने पटेल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फौजदार पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused in hit and run case in ravet arrested pune print news ggy 03 amy