पुणे : राजगुरुनगर भागातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून केल्याच्या घटनेविरोधात संतप्त नागरिकांनी शुक्रवारी बंद पाळला. तसेच, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. हॉटेलमधील कामगार असलेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजय चंद्रमोहन दास (वय ५४, रा. राजगुरूनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एका बीअर बारमध्ये काम करतो आणि जवळच भाडेतत्त्वावर खोलीत राहतो. त्याच्या घराच्या बाहेर सख्ख्या बहिणी खेळत होत्या. आरोपीने मुलींना खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या खोलीत नेले. तेथे त्याने मोठ्या बहिणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यामुळे लहान बहिणीने घाबरून आरडाओरडा केला. त्याने तिला घरातील पाण्याच्या पिंपात बुडविले. त्यानंतर दासने मोठ्या बहिणीवर अत्याचार करून तिलाही पाण्याच्या पिंपात बुडवून मारले. घटनेनंतर तो तेथून पसार झाला. खेड बसस्थानकातून तो सासवडकडे गेला. दरम्यान, मुली बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. खेड पोलिसांनी तपास करून दासला सासवड परिसरातून अटक करून शुक्रवारी खेड-राजगुरूनगर येथील सत्र न्यायालयात हजर केले.

हेही वाचा – पुण्यामुंबईबाहेर ‘आयटी’चा विस्तार! नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरला पसंती

‘आरोपीने पीडित मुलींचा खून कशा प्रकारे केला, त्यानंतर त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, त्याचे कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. आरोपीने गुन्हा केल्यावर मोबाइल संच फेकून दिल्याची कबुली तपासात दिली आहे. मोबाइल संच जप्त करायचा आहे,’ असा युक्तिवाद करून आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील व्ही. एन. देशपांडे यांनी केली. आरोपी दास याची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. आरोपीने यापूर्वी मुलींवर अत्याचार केले आहेत का, या दृष्टीनेही पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. न्यायालयाने आरोपी दासला एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – पिंपरी : पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न मिटणार; ‘या’ ठिकाणची मिळाली १५ एकर जागा

नातेवाइकांचा पोलीस ठाण्यासमोर आक्रोश

मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नातेवाइक आणि ग्रामस्थांनी केली. त्यांनी शुक्रवारी सकाळी खेड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करून पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली.

डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन

शिवसेना नेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी अत्याचारात बळी पडलेल्या मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केले. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. राजुरूनगर परिसरात मोठ्या संख्येने परगावातून नागरिक रोजगाराच्या शोधात येत आहेत. अत्याचार प्रकरणतील आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी. परिस्थितीजन्य पुरावे, न्यायवैद्यक पुरावे एकत्रित करुन हे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे चालवावे. याप्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. राजगुरूनगर परिसरात मजुरीसाठी वास्तव्यास येणाऱ्या मजुरांची नोंद करण्यात यावी, अशी सूचना डाॅ. गोऱ्हे यांनी केली. पीडित मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

महिला आयोगाकडून कठोर शिक्षेसाठी पाठपुरावा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली. अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षेसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे चाकणकर यांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच ते सहा तासात आरोपीला अटक केली. आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पोलिसांकडून भक्कम पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. मुलीच्या कुटुंबीयांना मनोधैर्ये योजनेतून मदत करण्यासाठी पोलिसांकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused in rajguru nagar case remanded in custody closed by villagers demand for death sentence to the accused pune print news rbk 25 ssb