पुणे : हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ यांचा सुपारी देवून खून केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी दिले. भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी देवून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. फ्लॅट नंबर २०१ लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. अनुसया पार्क, गणेश नगर, डोमखेल रस्ता, वाघोली, मूळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८,  रा. बजरंग नगर, बाजार तळ्याशेजारी, आव्हाळवाडी रस्ता, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय २९, रा. फ्लॅट नंबर ३०५ विघ्नहर्ता सोसायटी, शामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) अशी आरोपींची नावे आहेत. तर पोलिस अतिश जाधव या आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा >>> पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा

सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. या प्रकरणी वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अक्षय जवळकर हा पूर्वी सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. त्यांच्यात वाद झाल्यामुळे अक्षयने खोली सोडली होती. या कारणावरून अक्षयने चार-पाच महिन्यांपूर्वी आरोपी पवनला वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली होती. पवनने त्याचे साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांनी संगनमताने खुनाचा कट रचला.

सतीश वाघ ९ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता फिरायला गेले असता आरोपींनी त्यांचे मोटारीतून अपहरण करून सासवडच्या दिशेने घेऊन निघून गेले. त्यानंतर चाकूने त्यांचा खून करून मृतदेह उरूळी कांचन परिसरात शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला होता.  

हेही वाचा >>> पुणे: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक

आरोपींनी केलेले कृत्य हे घृणास्पद आणि मानवी जीविताला काळिमा फासणारे आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आरोपीकडून जप्त करावयाची आहेत. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून हा गुन्हा केला आहे. त्यांनी नक्की कट केव्हा, कोठे, कसा रचला याबाबत त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे. तसेच हा गुन्हा आरोपींनी नक्की कोणाच्या सांगण्यावरून केलेला आहे?  गुन्ह्यामघ्ये त्यांचा इतर कोणी मुख्य सूत्रधार आहे का? याबाबत त्यांचेकडे तपास करावयाचा आहे. आरोपी जवळकर याने इतर आरोपींना खून करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिलेली आहे. हे पैसे त्याच्याकडे कशाप्रकारे आलेले आहेत ? किंवा त्याला इतर कोणी ही रक्कम दिली याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा आसलेकर यांनी केला. या गुन्ह्यातील आरोपींवर कलम अपहरण करून खून केल्याचे कलम वाढविण्यात आले होते. तसेच चारही आरोपींचे मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत, असे तपास अधिकारी असलेले अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी न्यायालयास सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused in satish wagh murder case get police custody till december 20 pune print news vvk 10 zws