पुणे : सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करताना आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. आरोपीने मोहोळवर गोळीबार करताना गुंडाच्या नावाने घोषणा का दिल्या, तसेच संबंधित गुंड मोहोळ खून प्रकरणात सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी (५ जानेवारी) मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस होता. दुपारी एकच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा परिसरातून तो निघाला होता. पत्नीसोबत तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार होता. मोहोळच्या टोळीत नुकताच सामील झालेला मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी मोहोळवर पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. मोहोळचा खून झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली.
हेही वाचा : हत्येप्रकरणी गुंड शरद मोहोळच्या पत्नीने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, म्हणाल्या…
मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडताना पोळेकरने शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याचे उघडकीस आले. या खून प्रकरणात तो गुंड सामील आहे का? त्याने पोळेकरला सुपारी दिली का? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात मोहाेळचा खून जमिनीचा वादातून झाल्याची माहिती मिळाली आहे. पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांनी मोहळचा खून करण्यासाठी कट रचल्याचे उघडकीस आले आहे. मोहोळच्या खुनानंतर शहरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांसमोर टोळीयुद्ध रोखण्याचे आव्हान आहे.