लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पात्र ठेकेदाराचे नाव चुकविल्याने कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे उपलेखापाल महेश निगडे यांना ५०० रुपये दंड केला आहे. तसेच त्यांच्याकडील स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली.
महापालिकेचे उपलेखापाल निगडे यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मोशी येथील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या गायरान जागेत ७०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. या जागेस सीमा भिंत बांधणे आणि त्या अनुषंगाने कामे करण्यासाठी सिद्धनाथ कॉर्पोरेशन या ठेकेदाराची लघुत्तम निविदा प्राप्त झाल्याने त्या ठेकेदारास काम मंजूर करण्यात आले. मात्र, स्थायी समितीच्या प्रस्तावात संबंधित ठेकेदाराचे नाव ‘सिद्धनाथ कॉर्पोरेशन’ ऐवजी ‘सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन’ असे झाले होते.
आणखी वाचा-पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
त्यानंतर केवळ नाव दुरुस्त करून पुन्हा स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली. कामकाजात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत उपलेखापाल निगडे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना केलेला ५०० रुपये दंड वेतनातून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी काढून घेत त्यांच्याकडे पूर्णवेळ वैद्यकीय विभागात धन्वंतरी कक्षाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.