पुणे : काॅल सेंटरमधील सहकारी तरुणीवर कोयत्याने वार करून तिचा खून करणारा आरोपी कृष्णा कनोजा याला न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खून झालेल्या तरुणीने वडिलांवर उपचार करायचे असल्याचे सांगून आरोपीकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले होते. तरुणाने वडिलांकडे चौकशी केली. त्या वेळी तरुणीने खोटे बोलून पेैसे घेतल्याचे उघड झाले. खोटे बोलणे जिव्हारी लागल्याने त्याने तरुणीचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येरवडा भागातील एका बहुराष्ट्रीय काॅल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मंगळवारी सायंकाळी चाकूने वार करून खून करण्यात आला. कंपनीच्या वाहनतळावर ही घटना घडली. या प्रकरणी कंपनीतील तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय २८, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आर्थिक व्यवहारातून तरुणीचा खून झाल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपीच्या बँक खात्याचा तपशील घ्यायचा आहे. त्याने तरुणीचा खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने कनोजाला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>>मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल चित्रीकरणाचा प्रकार, शाळेतील शिपायाविरुद्ध गुन्हा शाळेचा शिपाई अटकेत

आरोपी कनोजा काॅल सेंटरमध्ये लिपिक होता. त्याची तरुणीशी २०२२ मध्ये ओळख झाली होती. तरुणी मूळची चिपळूणची आहे. तिचे वडील व्यवसायानिमित्त कराडला स्थायिक झाले होते. ती गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होती. वडील आजारी आहेत. ओैषधोपचारासाठी पैसे हवे असल्याचे सांगून तिने कनोजाकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले होते. कनोजा तरुणीच्या वडिलांना कराडला जाऊन भेटला. तेव्हा तरुणीने खोटे बोलून कनोजाकडून वडिलांच्या उपचारांसाठी पैसे घेतल्याचे उघड झाले. खोटे बोलल्याने कनोजा तिच्यावर चिडला होता. तिचे खोटे बाेलणे जिव्हारी लागल्याने त्याने तिचा खून केल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण

स्मितहास्य करून चाकूहल्ला

आरोपी कनोजा यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तरुणीने खोटे बोलून पैसे घेतले होते. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तरुणीचे काम सुरू होणार होते. ती बसने कंपनीच्या आवारात सायंकाळी सहाच्या सुमारास आली. काम सुरू होण्यास अर्धा तासांचा अवधी होता. काॅल सेंटरमधील वाहनतळावर ती मैत्रीणीसोबत गप्पा मारत थांबली होती. कनोजा आणि तरुणीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. कनोजा तेथे आला आणि त्याने स्मितहास्य केले. ‘माझ्या पैशांचे काय केले?,’ अशी विचारणा त्याने तिच्याकडे केली. काही कळायच्या आत त्याने तिच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. कनोजाने केेलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused of murdering young woman remanded in custody pune print news rbk 25 amy