लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : भोसरीतील गव्हाणे वस्ती-आदिनाथनगर येथे १२ मोटारी आणि एका टेम्पोची तोडफोड करणार्या एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या टोळक्याची घटनास्थळ परिसरातून धिंड काढण्यात आली.
करण बाळू ससाणे (२०, चिंचवड), संकेत दत्तात्रय पडर (२०, भोसरी), करण अमोल सासणे (१८, भोसरी) आणि प्रेम रवि गिरी (१८, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर, अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. अमरसिंग मनबहादूर थापा (४७, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री आरोपी हातात कोयता घेऊन आले. दगड आणि कोयत्याने त्यांनी सुखवानी बाग सोसायटीसमोर रस्त्याकडेला उभ्या केलेल्या दिसेल त्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यांनी १२ मोटारी आणि एका टेम्पोच्या काचा फोडल्या. भोसरी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली. अटक केलेल्या चार आरोपींची तोडफोड केलेल्या परिसरातून धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईबद्दल स्थानिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, भोसरी ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास खाडे म्हणाले, तोडफोड प्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते.
दरम्यान, गव्हाणे वस्ती – आदिनाथनगर रस्त्यावर सुखवानी बाग सोसायटी आहे. सोसायटीतील काही नागरिकांसह आजुबाजूला राहणारे रहिवाशी रात्रीच्या वेळी आपली वाहने या रस्त्याकडेला उभी करतात. रविवारीही नेहमीप्रमाणे रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याकडेला उभी केली होती. मध्यरात्री एक ते सव्वाएकच्या सुमारास करण आणि त्याचे साथीदार हातात कोयता घेऊन आले.
दगड आणि कोयत्याने त्यांनी रस्त्याकडेला उभ्या केलेल्या दिसेल त्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यांनी बारा मोटारी आणि एका टेम्पोच्या काचा फोडल्या. सोसायटीचे रखवालदार थापा यांनी आरडा ओरडा करीत आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्या दिशेने वीट फेकून मारली. सुदैवाने थापा बाजूला सरकल्याने बचावले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.