पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली. नदीपात्रात पडलेला मुलगा जलपर्णीमुळे बचावला. मुलगा नदीपात्रात पडल्यानंतर स्थानिकांनी मुलाला पाण्यातून बाहेर काढले.

नेल्सन एल. आर. शाम (वय १५) असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत निकाळजे (वय १९, रा. बोपोडी) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नेल्सनची आई डॉर्थी सायमन एल.आर. शाम (रा. बोपोडी) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने नदीत ढकललं

नेल्सन आणि आरोपी प्रशांत मित्र आहेत. शनिवारी (१६ एप्रिल) प्रशांतने नेल्सनला बोपोडीतील हॅरिस पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने नेले. रेल्वे पुलावरून नेल्सनला सकाळी साडेदहाच्या सुमारास नदीपात्रात ढकलून प्रशांत पसार झाला. नदीपात्रात जलपर्णी असल्याने नेल्सन बचावला. जलपर्णी पकडून त्याने जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आला. रहिवाशांनी त्याला नदीपात्रातून बाहेर काढले.

हेही वाचा : पुण्यात भांडणे सोडविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मनगटाचा चावा, एकाला अटक

आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेल्सनला आरोपीने का ढकलून दिले, याबाबतची माहिती मिळाली नाही. पसार झालेला आरोपी प्रशांतचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे यांनी सांगितले.

Story img Loader