पुणे: महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.राजकुमार शामलाल परदेशी (वय २६, रा. मोरे चाळ, बालाजीनगर, धनकवडी, सध्या रा. रामपूर, लालगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बालाजीनगर परिसरात एकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परदेशी आणि साथीदारांविरुद्ध गेल्या वर्षी सहकारनगर पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर पसार झाला होता. तो उत्तर प्रदेशात वास्तव्यास होता. परदेशीविरुद्ध गंभीर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पसार झालेला परदेशी हा बालाजीनगर परिसरात मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा >>>श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घेतले दर्शन

कोयता उगारून दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले शहरातून तडीपार केल्यानंतर कोयता उगारून दहशत माजविणाऱ्या गुंडाला वारजे पोलिसांनी अटक केली. अभिजीत उर्फ चौक्या तुकाराम येळवंडे (वय २६, रा. जाधव चाळ, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. येळवंडेला शहरातून दोन वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश भंग करून कर्वेनगर भागातील अब्दुल कलाम शाळेजवळ कोयता उगारून त्याने दहशत माजविल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. माझी माहिती पोलिसांना कोणी दिली, अशी विचारणा करुन त्याने नागरिकांना शिवीगाळ केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच पसार झालेल्या येळवंडेला पाठलाग करून पकडले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused who escaped after mokka operation arrested pune print news rbk 25 amy