१४ वर्षांपूर्वी एका महिलेची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या गुन्ह्यातील आरोपी फरार होता. त्याला अखेर 14 वर्षांनी गजाआड करण्यात पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट एक च्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. पत्नीसोबत घटस्फोट घ्यायचा तगादा आणि बलात्काराचा गुन्हा टाकण्याची दिलेली धमकी यामुळं आरोपी आप्पा गोमाजी मोहितेने अनैतिक संबंध असलेल्या मैत्रिणीची निर्घृण हत्या केली होती. अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा- आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वत: कधी…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पा मोहिते याचे त्याच्याच मैत्रीणीसोबत अनैतिक संबंध होते. त्या महिलेचे आप्पावर एकतर्फी प्रेम जडले. तू तुझ्या पत्नीला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न कर तस न केल्यास तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा टाकेल, अशी धमकी त्याला दिली होती. त्यामुळं आधीच गुन्हेगार पार्श्वभूमीचा असलेल्या आप्पा मोहितेने २१ एप्रिल २००८ मध्ये मैत्रिणीच अपहरण करून तिला खोलीत डांबून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.
आप्पा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो प्रकाश चव्हाण या टोळीचा सक्रिय सदस्य होता. हत्येचा घटनेनंतर तो पसार झाला होता. त्याच्यावर पोलीस पाळत ठेवून होती. पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही. तो नाव, गाव बदलून राहायचा. दरम्यान, तो चाकण एमआयडीसीत मिळेल ते काम करून पोट भरत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांनी दिली. तो पुण्यातील वाकी, राजगुरूनगर येथे राहात असल्याचं समोर आलं. १४ वर्षांनी त्याला पुन्हा पकडणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होत. तो कसा दिसतो याविषयी माहिती नव्हती. तो केवळ काम करतो आणि वाकी येथे राहतो एवढीच माहिती पोलिसांना होती. तरी देखील पोलिसांनी वाकी येथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. सदर ची कारवाई गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी महाडिक, सचिन मोरे, महाले, कमले प्रशांत माळी यांनी केली आहे.