लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : भांडण सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइतांना गुन्हे शाखेने सोलापूर परिसरातून अटक केली. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय १९, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना पाहिले. गायकवाड यांनी भांडणात मध्यस्थी करून आरोपी निहालसिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. टाक आणि साथीदार भोंड पसार झाले.

आणखी वाचा-पिस्तुलाच्या धाकाने तरुणाची लूट, येरवडा पोलिसांकडून तिघे अटकेत

पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक निरीक्षक गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पसार झालेल्या सराइतांना पकडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने टाक आणि भोंड यांना सोलापूर परिसरातून ताब्यात घेतले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused who stabbed the police officer and ran away were arrested pune print news rbk 25 mrj