पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींनी मुळशी तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनंजय मारुती वटकर (वय २५, रा. कराड), सतीश संजय शेडगे (वय २८, रा. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आरोपींना पिस्तुले कोणी पुरवली, याचा शोध घेण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार साहिल पोळेकर आणि साथीदारांना वटकर आणि शेडगे यांनी पिस्तुले पुरविल्याचे उघड झाले. त्यानंतर दोघांना गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

या खून प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा), ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उडान यांना अटक करण्यात आली आहे. ॲड. पवार आणि ॲड. उडान यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले. पोळेकर, कानगुडे, शेळके, गव्हाणकर, गांदले यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

या खून प्रकरणातील आरोपींविरोधात १२० ब (कट रचणे) हे अतिरिक्त कलम लावण्यात यावे, असा अर्ज तपास अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी मुळशी तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला आहे. गोळीबाराची ठिकाणे शोधायची आहेत. आरोपींना एकाने सीमकार्ड दिले. सीमकार्डद्वारे आरोपींनी काहीजणांशी संपर्क साधला त्यांचा शोध घ्यायचा आहे. खून करून आरोपी रिक्षातून पसार झाले. त्या रिक्षाचालकाचा शोध घ्यायचा आहे. आरोपी आणि साक्षीदारांची समोरासमोर चौकशी करायची आहे. तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाकडे केली. सरकारी वकील ॲड. नीलिमा इथापे-यादव आणि तक्रारदारांचे वकील ॲड. गोपाल भोसले यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.

बचाव पक्षाचे वकील ॲड. केतन कदम यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली. तपास अधिकाऱ्यांनी बँक व्यवहाराच्या नोंदी तपासणी, सीसीटीव्ही चित्रीकरण असे तांत्रिक पुरावे पडताळण्यासाठी पोलीस कोठडी मागितली आहे. तांत्रिक तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज नाही. आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती ॲड. कदम यांनी युक्तिवादत केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींच्या पोलीस कोठडीत सात दिवस वाढ करण्याचे आदेश दिले.

पोलीस ‘प्लँचेट’ करतात!

पोलीस आरोपींची कोठडी मागतात. त्यानंतर वेगळ्या गोष्टी तपासात उघड होतात. पोलीस ‘प्लँचेट’ करतात, असा आरोप बचाव पक्षाचे वकील ॲड. केतन कदम यांनी युक्तिवादात केला. मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी ‘प्लँचेट’चा वापर केला नाही. बचाव पक्षाच्या वकिलांनी जे आरोप पोलिसांवर केले आहेत. संबंधित आरोपांची न्यायालयाने नोंद करून घ्यावी, असे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले. बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेले आरोप सरकारी वकील ॲड. नीलीमा इथापे-यादव यांनी फेटाळून लावले.