कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेल्या मात्र आडबाजूला असल्याने सुरुवातीपासून प्रेक्षकांनी पाठ फिरवलेल्या पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिराची सद्यस्थितीत प्रचंड दुरवस्था झाली आहे. महापालिकेचे स्थापत्य व विद्युत विभाग तसेच प्रभाग कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने अत्रे रंगमंदिराचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. दुरुस्तीच्या कामांसाठी ३५ लाख रुपये खर्चाची कामे काढण्यात आली होती. तथापि, निविदांमध्ये स्पर्धा न झाल्याने त्या उघडण्यात आल्या नाहीत.
पिंपरीत संत तुकारामनगर येथे यशवंतराव चव्हाण रुग्णालयासमोर महापालिकेने तेरा वर्षांपूर्वी हे नाटय़गृह बांधले. मात्र, सुरुवातीपासून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणाऱ्या या रंगमंदिराकडे नाटक कंपन्या कधी फिरकल्याच नाहीत. त्यामुळे नाटके होत नाहीत. बँका, शाळांचे कार्यक्रम व मेळावे मात्र होतात. अत्रे रंगमंदिराकडे येण्या-जाण्याची चांगली सुविधा नाही, त्यामुळे गैरसोय होते. पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे रस्त्यावर गाडय़ा लागतात. वाहतुकीची कोंडी होते. सभागृहात वातानुकूलित यंत्रणा नाही. आत बसलेल्यांना अक्षरश: उकडते. पंखे सुरू झाल्यावर त्याचेच आवाज जास्त येतात. पावसाळ्यात चारही बाजूने नाटय़गृहात गळती होते. स्टेजवर पट्टय़ा तुटलेल्या आहेत, फळ्या निघालेल्या आहेत. पडदा वरखाली होत नाही. खुर्च्यांची मोडतोड झालेली आहे. नागरिकांना बसताना त्रास होतो. उपाहारगृहाचा ठेका निश्चित नाही. त्यामुळे कलावंत असो की प्रेक्षक सर्वाच्याच चहापाण्याचे वांदे आहेत. सुरक्षिततेची बोंब आहे. अशा समस्यांची जंत्री स्थानिक प्रशासनाकडून वरिष्ठांना कळवण्यात येते. मात्र, अधिकाऱ्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. या विभागासाठी महिला सहायक आयुक्त आहेत. त्यांची कार्यपध्दती पाहता त्या असून नसल्यासारख्या आहेत. स्थापत्य विभागातील अधिकारी व कर्मचारी बिलकूल सहकार्य करत नाही, असा नाटय़गृहातील सूर आहे. यापूर्वीचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी शहरातील तीनही नाटय़गृहांच्या समस्यांची पाहणी केली, तेव्हा दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना तंबी दिली होती, त्याचा पाठपुरावाही केला होता. मात्र, कदमांच्या बदलीनंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा