पुणे : अमरावतीतील सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना बालेवाडी भागात घडली. पत्नी आणि पुतण्याचा खून करून सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
या घटनेत सहायक आयुक्त गायकवाड यांची पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. सहायक आयुक्त गायकवाड अमरावतीतील राजपेठ विभागात सहायक पोलीस आयुक्त आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने ते पुण्यात आले होते. पुण्यात बालेवाडी भागात गायकवाड, त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या राहायला होते. रविवारी मध्यरात्री गायकवाड यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.
हेही वाचा – ‘पुणेरी मेट्रो’च्या कामाला गती; ७० टक्के खांबांची उभारणी पूर्ण
हेही वाचा – पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीविहितहानी नाही
गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गायकवाड यांच्याकडे असलेले पिस्तूल जप्त केले आहे. गायकवाड यांनी खासगी वापरासाठी पिस्तूल घेतले होते. त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याचा खून का केला? याबाबतची माहिती मिळू शकली नाही. चतु:शृंगी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.