दाभोळकर आणि पानसरे खून प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी ३४ वर्षांच्या कार्यकाळात अनेक प्रकरणं हाताळली आहेत. बापू बिरु वाटेगावकर, गजा मारणे, बाप्या नायर, फरासखाना पोलीस ठाणे येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांनी तपास अधिकारी म्हणून काम केलं आहे. श्रीधर जाधव यांना एकूण ३०० पेक्षा अधिक बक्षिसे मिळाली आहेत. मंगळवारी (३० नोव्हेंबर) ते सेवानिवृत्त झाले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी मुंबई घाटकोपर येथील चिरागनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदापासून नोकरीस सुरुवात केली. जाधव यांनी ३४ वर्षांच्या काळात अनेक चढउतार पाहिले. त्यांनी निवृत्त होताना यापैकीच काही आठवणींना उजाळाही दिला.
“पोलीस स्टेशनवरील हल्ल्यानंतर २४ तासात बापू वाटेगावकरांना अटक”
ते म्हणाले, “१९९१-९२ मध्ये मोबाईल नव्हते. त्यामुळं गुन्हेगारांना पकडने फार आव्हानात्मक असायचे. तेव्हा, बापू बिरु वाटेगावकर यांना सोडवण्यासाठी काही जणांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि कस्टडीत असलेल्या वाटेगावकर यांना पळवून नेले होते. तेव्हा मी आणि माझ्या इतर सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, ते कमांडर मोटारीतून पळून गेले होते. त्या मोटारीचा उजवा इंडिकेटर सुरू होता त्यावरून सर्वांचा शोध घेतला. अवघ्या २४ तासात ११ जणांना ताब्यात घेतलं होतं. अस जाधव यांनी सांगितलं.
हेही वाचा : पुणे: “तू मोठी झालीयेस का हे पाहायचंय” असं सांगत बापाचा आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुढे श्रीधर जाधव म्हणाले, “गजा मारणे याच्या तपासात कोणते अधिकारी धजावत नव्हते. त्याची दहशत होती. तेव्हा, ९ किलोमीटर बेड्या घालून त्याची धिंड काढली होती. आरोपींना आरोपीसारखं ट्रीट केलं पाहिजे.” “कोल्हापूर जिल्हा आणि पुणे ग्रामीण येथे काम करत असताना खूप छान अनुभव आले. तेथील नागरिकांनी खूप सहकार्य केलं. चांगले अधिकारी देखील मिळत गेले,” असंही जाधव यांनी नमूद केलं.