मी लिहितो त्याची भाषा वेगळी आहे. माझे लेखन तुम्ही पडद्यावर पाहता. नानाविध अनुभवांचे सादरीकरण असलेला अभिनय हेच माझे लेखन आहे, असे प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याने सांगितले.
‘अमेय इन्स्पायिरग बुक्स’तर्फे हिमालयातील ट्रेकसंबंधी आणि तेथील लोकजीवनाबद्दलची रंजक माहिती असलेल्या ‘उडणाऱ्या लामांचा प्रदेश आणि ‘हिमालय प्रवासातील सत्यकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वप्नील जोशी याच्या हस्ते झाले. या पुस्तकाचे लेखक गौरव पुंज, अनुवादिका प्रा. रेखा दिवेकर, फिटनेसतज्ज्ञ ऋजुता दिवेकर, प्रकाशक उल्हास लाटकर या वेळी उपस्थित होते.
आपण किती नगण्य आहोत याची जाणीव घ्यायची असेल तर, निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्गाचा मार्ग साधा, सोपा आणि स्वच्छ आहे. आपला अहंकार दूर करण्यासाठी निसर्गामध्ये जाणे महत्त्वाचे आहे. निसर्गाचा आस्वाद या प्रवासवर्णनाद्वारे घेता येईल. हे पुस्तक पाहिल्यावरच प्रवासाला निघावेसे वाटते, असेही स्वप्नील याने सांगितले. स्टार अभिनेते लेखनाकडे वळत असताना तू कधी लेखन करणार, असे विचारले असता पुस्तक लिहून तरी मी स्टार होईन अशी टिप्पणी केली. सध्या माझा वाचनाचा काळ सुरू आहे. वाचक म्हणूनच मी बरा आहे. तेच माझ्यासाठी आनंददायी आहे, असेही त्याने सांगितले.
हिमालयातील अनवट ठिकाणांची माहिती या पुस्तकातून दिली असल्याचे गौरव पुंज यांनी सांगितले. प्रा. रेखा दिवेकर म्हणाल्या, लेकीच्या ‘लूज युवर वेट’ या पुस्तकानंतर आता जावयाचे पुस्तक अनुवादित केले आहे. अनुवादक या नात्याने गौरवच्या लेखनाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ऋजुता दिवेकर यांनी सर्वाशी संवाद साधला. उल्हास लाटकर यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा