पिंपरी : रुग्ण सेवा सोडून कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आठ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला. वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा जावळे, लिपिक प्रतिभा मुनावत, सुषमा जाधव, साहाय्यक भांडारपाल कविता बहोत, शिपाई शमलता तारु आणि विनापरवाना प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणाऱ्या परिचारिका सविता ढोकले, नूतन मोरे, निलीमा झगडे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वायसीएम रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता ऑक्टोबर २०२२ पासून दररोज दुपारी तीन ते साडेचार या वेळेत योग विषयक प्रशिक्षण घेत होते. सामान्य प्रशासन विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत हा प्रकार आढळून आला. रुग्णांना तातडीने सेवा देण्याची जबाबदारी असताना कार्यालयीन वेळेत कर्मचारी योग प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहिल्याने वायसीएमच्या अधिष्ठात्यांकडून खुलासा मागविला. योग प्रशिक्षण वर्गास कोणतीही लेखी मान्यता दिली नसल्याचे त्यांनी कळविले.
हेही वाचा >>> पिंपरी : विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या दोन सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस
या कर्मचाऱ्यांनी नोटिसीचा केलेला खुलासा सयुक्तिक नाही. कर्मचाऱ्यांनी सेवेत अडथळा निर्माण केला. त्यामुळे विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांचा खुलासा विचारात घेऊन आयुक्तांनी दंडात्मक कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार डॉ. जावळे यांच्यावर ५३ हजार ३५६, मुनावत २२ हजार ३२, जाधव दहा हजार ४३२, बहोत ११ हजार ९०४ आणि तारु यांच्यावर ११ हजार ८९६ रुपये दंडाची कारवाई केली. त्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. विनापरवाना योग प्रशिक्षणास उपस्थित राहणाऱ्या परिचारिका ढोकले, मोरे, झगडे यांना प्रत्येकी २०० रुपये दंड लावला आहे.