लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा खेळण्याच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस ठाणे, गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पायी गस्त घालण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
नवरात्रोत्सव उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त चौबे यांनी तिन्ही परिमंडळ कार्यालयांमध्ये भेट देऊन आढावा घेतला. आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या १८ पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी सूचना दिल्या. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, विशाल गायकवाड, स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, मुगुटलाल पाटील, राजेद्रसिंह गौर यावेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-पुणे स्टेशन परिसरातील दुकानाला आग, दुकानाच्या परिसरातील लॉजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका
नवरात्र उत्सवामध्ये दांडिया खेळण्याच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात आवश्यक तो बंदोबस्त लावण्यात यावा. हद्दीतील उद्याने, मोकळी मैदाने, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे या जागी गस्त घालावी. गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना पोलीस आयुक्त चौबे यांनी दिल्या.
नवरात्रौत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी गर्दी होत असते. गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेण्याचेही आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार दररोज गर्दीच्या ठिकाणी पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पायी गस्त घालावी, अशा सूचना दिल्या आहेत.
आणखी वाचा-कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
नवरात्र मंडळांना सूचना
नवरात्रौ मंडळांनाही सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावावेत, देवीची मूर्ती असलेले ठिकाण आणि दांडिया खेळण्याच्या ठिकाणी मंडळांनी स्वयंसेवक नेमावेत, असे सुचविण्यात आले आहेत. उत्सव शांततेत होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस आयुक्त चौबे यांनी केले आहे.