मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील अनधिकृत बांधकाम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पाडण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारवाईत शामकुमार ऊर्फ शामसुंदर अकलु साह यांचे ४ हजार ३३० चौ. फुटांवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. साह यांना अनधिकृत बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३(१) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस प्राप्त झाल्यानंतरही त्यांनी बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यामुळे त्यांचे अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. तहसीलदार अर्चना यादव, उपअभियंता वसंत नाईक, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

पीएमआरडीएमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका, लोणावळा, तळेगाव, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, शिरूर आणि सासवड अशा सात नगरपालिका यांचा समावेश असून त्यामध्ये पुणे शहर, मावळ, हवेली व मुळशी तालुक्यांचे पूर्ण क्षेत्र असून उर्वरित तालुक्यांमधील एकूण ८६५ गावांच्या समावेशासह एकूण ७ हजार २५६ चौ.मी. एवढे प्राधिकरणाचे क्षेत्र आहे. नागरिकांनी प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात घर खरेदी करण्यापूर्वी संबंधित बांधकामांना प्राधिकरणाची किंवा प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची अकृषिक परवानीसह बांधकाम परवानगी आहे किंवा कसे? याची शहानिशा करून घ्यावी. अनधिकृत मालमत्ता विकत घेण्यातून होणारे आर्थिक नुकसान व फसवणूक टाळण्यासाठी मालमत्तांबाबत खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against illegal construction