लोकसत्ता वार्ताहर
इंदापूर : बंदी घालण्यात आलेल्या वडाप आणि पंड्याच्या साह्याने उजनी धरणात लहान माशांची मासेमारी वाढली आहे. ही अवैध मासेमारी रोखण्यासाठी जलसंपदा, महसूल, मत्स्यविभाग आणि पोलीस विभागाने कारवाई सुरू केली आहे.
कारवाईला कात्रज येथून सुरुवात झाली. कात्रज, टाकळी, केत्तूर आदी भागांत ही कारवाई करून वडाप आणि पंड्याच्या जाळ्या नष्ट करण्यात आल्या. उजनी जलाशयात वडाप व पंड्याच्या साह्याने होत असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे धरणातील ४० ते ५० माशांच्या दुर्मीळ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. चिलापी, मांगुर, सकर या माश्यांच्या प्रजाती वाढल्या आहेत. त्यामुळे मत्स्य उत्पादन घटून रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण रोखण्याचे काम मासे नैसर्गिकरीत्या करीत असतात. मात्र, उत्पादन घटल्याने प्रदूषणही वाढले आहे.
माशांचे घटलेले उत्पादन, रोजगाराचा निर्माण झालेला प्रश्न आणि प्रदूषण लक्षात घेता, स्थानिक मच्छिमार संघटनेच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने उजनीत गेल्या वर्षापासून मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. गावरान जातींच्या माश्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी वडाप आणि पंड्याच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे.
स्थानिक मच्छिमारांनी अवैध मासेमारीबाबत जलसंपदा आणि पोलीस खात्याला माहिती दिली आहे. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. -चंद्रकांत भोई, मच्छीमारांचे नेते, भिगवण
उजनी धरणामध्ये सुरू असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. संबंधितांना नोटिसा देण्यात येणार आहेत. अवैध मासेमारी करू नये, असे आवाहन केले आहे. -अमित झोळ, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग