लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : वायुप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारे बांधकाम व्यावसायिक, कचरा जाळणारे, हवेचे प्रदूषण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा दंडुका उगारला आहे. तीन दिवसांत ३० लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३२ प्रभागांमध्ये १६ वायुप्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेट देऊन छायाचित्रे, चित्रफितीद्वारे त्यांची नोंद घेण्यात येत आहे. या दरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. नोटीस देऊन कामाची जागा लाखबंद (सील) केली जात आहे.
आणखी वाचा-जेजुरीत उद्या सोमवती अमावास्या यात्रा, भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर होणार कारवाई
ताथवडेतील कंपनी मालकावर गुन्हा
थेरगावातील केजूदेवी बंधारा येथे पवना नदीमधील पाण्यावर तवंग उमटत असल्याने दुर्गंधी येत होती. त्यामुळे पर्यावरण व जलनि:सारण विभागाने ताथवडे भागात सर्वेक्षण सुरू केले होते. ताथवडेतील कपडे धुणाऱ्या (ड्रायक्लीनर) कंपनीने रसायनयुक्त पाणी विनाप्रक्रिया पवना नदीपात्रात सोडले. हे पाणी काळपट, निळसर, फेसयुक्त होते. नदीचे पाणी दूषित करून जलचर, तसेच मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कंपनीचे मालक अभिषेक टंकारिया यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-पुणे : लक्ष्मीपूजनानिमित्त आज मेट्रोची रात्र सेवा बंद, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक
चित्रफीत, रील स्पर्धा
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी’ अभियान राबविण्यात येत आहे. प्लॅस्टिकचा वापर, प्रदूषण टाळणे, पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करून दिवाळी साजरी करावी. फुलांच्या रांगोळीचा वापर, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार कराव्यात. त्याबाबतची ३० सेकंदांची चित्रफीत, रील #SwachhDiwali या हॅशटॅगचा वापर करून समाजमाध्यमावर टाकावा. तसेच @sbmurbangov आणि @pcmcindiagovin या एक्स व इन्स्टाग्राम हँडलला टॅग करणे अनिवार्य आहे. २२ हजार रुपयांची ३० बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत.
वायुप्रदूषण नियंत्रण पथकाकडून विविध जागांची पाहणी करण्यात येत आहे. वायुप्रदूषण रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. -संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका