शिरूर : शिरुर नगरपरिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलत कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत, थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईला सुरुवात झाली असून शहरातील भाजी बाजारमधील गाळा क्र. १६ थकीत मालमत्ता करापोटी सील करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भातील आधिक माहिती देताना कर संकलन विभागाचे कर निरीक्षक अक्षय बनगिनवार, सहाय्यक कर निरीक्षक दिपक कोल्हे चंद्रकांत पठारे यांनी सांगितले की शिरुर शहरात एकुण मालमत्ता १४१२८ आहे. त्यात शासकीय कार्यालय ८४ आहेत. यंदाचा वर्षाकरीता मालमत्त्ता करवसूलीसाठी एकूण मागणी १०.१६ कोटी रुपयांची आहे. १ जानेवारी २०२५ अखेरपर्यंत एकूण वसुली ३.३२ कोटी रुपयांची झाली आहे. शासकीय कार्यालयाची थकबाकी ३० लाख रुपयेची आहे.

नगर परिषद चा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर दरवर्षी ०१ एप्रिल रोजी देय होतो तसेच पहिल्या सहामाही पूर्वी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणे अनिवार्य आहे अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये थकीत रकमेवर दरमहा २ % शास्ती आकारण्यात येते. सर्व मिळकत धारकांना आत्ता पर्यन्त भ्रमणध्वनीवर ४ वेळेस कर भरणा करणेबाबत संदेश पाठवण्यात आले आहे. डिसेंबर २०२४ पासून मालमत्ता कराचा भरणा करणेबाबत शहरात नगर परिषदच्या १० घंटा गाडी द्वारे दवंडी देखील देण्यात येत आहे.

शिरूर नगरपरिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने, कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत, थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई ला सुरुवात झाली असून भाजी बाजार मधील गाळा क्र. १६ थकीत मालमत्ता करापोटी सील करण्यात आला आहे. थकीत मालमत्ता धारकांच्या मालमत्तेची जप्तीची कार्यवाही या पुढे ही अशीच सुरू ठेवली जाणार असल्यामुळे कराचा भरणा करून जप्तीची अप्रिय कार्यवाही टाळण्याचे आवाहन शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे.

जुलै २०२४ मध्ये कर मागणीचे देयके वितरित करण्यात आले असून १५ दिवसांत कर भरल्यास १% सूट त्यावेळी होती . शहरातील १४१२८ मिळकतींसाठी ६ विशेष पथके तयार करण्यात आली असून जवळपास ५०० थकबाकीदारांना नोटीस दिल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाद्वारे नळ जोडणी तोडण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून घरबसल्या भरणा करण्यासाठीशिरुर नगरपालिकेच्या वेबसाइटवर भेट देऊन भरणा करता येणार असून कर मागणी देयकावर क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आला असून गुगल पे, फोन पे व युपीआयद्वारे कर भरणा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.