वानवडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुंडाला कोल्हापुरातील कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात येणार आहे. अजय विजय उकिरडे (वय २०, रा. रामटेकडी, हडपसर) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.
हेही वाचा- वितरक नेमण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ७५ लाखांची फसवणूक; दिल्लीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
उकिरडे याच्या विरोधात शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली होती. कारवाईनंतर त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे वानवडी पोलिसांनी उकिरडे याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. त्यानंतर उकिरडे याला वर्षभरासाठी काेल्हापूरमधील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आतापर्यंत शहरातील ८४ गुंडांच्या विरोधात एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.