पिंपरीतील दोन लाख ७९ हजार वाहनचालकांवर कारवाई होणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाजी खांडेकर, पिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांनो, तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर सावधान! कारण वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. नियम मोडल्यानंतर पोलीस तुमच्याशी वाद न घालता तुमच्या न कळत तुमच्या वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र घेऊन तुम्हाला सोडून देतील. मात्र, नंतर दंडाची नोटीस घेऊन पोलीसच आपल्या दारात उभा राहील. गेल्या दहा महिन्यात नियम मोडणाऱ्या दोन लाख ७९ हजार वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांनी अशाप्रकारे गोळा केली आहे आणि त्यातील ४६ हजार ७०० वाहन चालकांना देण्याच्या नोटीस तयार झाल्या आहेत. या नोटिसा वाहन चालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीचे नियम मोडून वाहने दामटणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अडवून दंडाची पावती फाडण्यास सांगितल्यानंतर ‘दादा’, ‘भाऊ’, ‘भाई’, ‘काका’, ‘मामा’ला फोन लावून पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या घटना सातत्याने घडतात. त्यावर उपाय म्हणून वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर संबंधित वाहन चालकाला न थांबवता किंवा त्याच्याशी काहीही न बोलता नियम मोडणाऱ्या वाहनाचा क्रमांक असलेल्या पाटीचे छायाचित्र काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिले.

आयुक्तांच्या आदेशानुसार चौकांमध्ये नियुक्तीस असलेले वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या वाहनांचे क्रमांक त्यांच्याकडील मोबाइल कॅमेऱ्यात टिपतात. त्या वाहन क्रमांकावरुन त्या वाहन चालकाचे नाव, पत्ता शोधून काढला जातो. त्या नाव आणि पत्त्यावर दंडाची पावती घेऊन पोलीस घरी पोचतात.

या कारणांसाठी दंड

सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट जाणे, वेगाची मर्यादा न पाळणे, अनधिकृतरीतीने वाहने उभी करणे, पार्किंगच्या ठिकाणी वाहनांचे दुहेरी पार्किंग करणे, सीट बेल्ट न वापरणे, मोठय़ाने हॉर्न वाजवणे अशा विविध कारणांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनाचे छायाचित्र घेऊन त्यांना दंड केला जात आहे.

कारवाईचे परिणाम

* वाहतूक पोलिसांनी केलेला दंड न भरल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच पारपत्र कार्यालयात गेल्यानंतर  संबंधिताच्या दंडाची थकबाकी ऑनलाईन दिसते. त्यामुळे दंड भरल्याशिवाय वाहन चालकाचे तेथील काम होत नाही.

*  वाहतुकीचे नियम मोडण्याची सवय झालेल्यांना आपण किती वेळा नियम मोडले याची माहिती नसते. नोटीस घरी आल्यानंतर दंडाचा आकडा पाहिल्यानंतर ही माहिती मिळते.

* पोलिसांच्या वाहतूक विभागाने केलेली कारवाई (१ जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०१८)

*  सांगवी- ६१ हजार २६९, हिंजवडी- ४० हजार ८८८, निगडी- ४४ हजार ४४४, पिंपरी- ४० हजार ८३२, चिंचवड- ४६ हजार ९९५, भोसरी- ३८ हजार ९८७, चाकण- पाच हजार ३४७ (एकूण दंडाची रक्कम- चार कोटी ५० लाख)

वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर कारवाई करताना वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यामध्ये वाद होऊ नयेत यासाठी वाहनांचे क्रमांक घेऊन कारवाईची नोटीस संबंधित वाहनचालकाच्या घरी पोहोचविण्यात येणार आहे.

आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त, पिंपरी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against two lakh 79 thousand drivers for breaking the traffic rules in pimpri