लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर भागातील ‘युनिकॉर्न हाऊस’ या पबविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी संबंधित पब लाखबंद (सील) केला.

युनिकॉर्न हाऊस पबम परिसरात गुरुवारी (११ एप्रिल) मध्यरात्री दोन गटात वादावादी झाली झाली होती. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मध्यरात्री पब बंद करण्यात आला होता, तसेच आतमध्ये सफाईचे काम सुरू होते. यापूर्वी संबंधित पबविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते, तसेच दहा खटले दाखल करण्यात आले होते. पबच्या समोर झालेल्या वादावादीत पोलिसांकडे कोणी तक्रार दिली नाही, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.

युनिकॉर्न हाऊस पबविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम १४२ (२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पब सील करण्यात आला. गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पूर्वी युनिकॉर्न हाऊस या पबचे नाव ‘एलोरा’ होते. त्यानंतर त्याची नोंदणी ‘युनिकॉर्न हाऊस’ या नावाने झाली. सध्या या पबचे नामकरण ‘बजेट रुम’ करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या घटनेनंतर कल्याणीनगर, कोरेगाव पार्क परिसरातील रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पबविरुद्ध नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. अपघातानंतर विविध यंत्रणा जागा झाल्या. त्यानंतर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा प्रशासनाने कारवाई करून ५० पबविररुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. प्रशासनाने ५० पब लाखबंद केले होते.

रात्री उशीरापर्यंत सुरू असलेले पब, रेस्टोरंट, बारचालकांसाठी पोलिसांनी नियमावली तयार केली होती. नियमावलीचे पालन न करणाऱ्या पब, रेस्टोरंटविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला होता. कारवाई केल्यानंतर पुन्हा मध्यरात्री उशीरापर्यंत कल्याणीनगर भागातील पब सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. मध्यरात्री पार्टी करुन परतणाऱ्या मोटारचालक गौरव आहुजाने कल्याणीनगर भागातील शास्त्रीनगर चौकात लघुशंका केल्याची घटना नुकतीच घडली होती. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी आहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना अटक केली होती.