पुणे : कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील रस्ते सुस्थितीत आणल्यानंतर आता यापुढील काळात कोणतेही रस्ते खोदले जाणार नाही, असा शब्द महापालिकेच्या पथ विभागाने दिला होता. मात्र, त्यानंतरही हे रस्ते खोदले गेल्याने हे रस्ते खोदणाऱ्या संबंधित ठेकेदार, बिल्डर आणि हे काम करायला लावणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाकडून देण्यात आली.
शहरातील रस्त्यांवरून ये-जा करताना वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पथ विभागाने गेल्या महिन्यात शहरातील १५ रस्त्यांची डागडुजी केली होती. पथ विभागाने केलेल्या या कामाचे सर्वच स्तरांतून कौतुक झाल्यानंतर पथ विभागाच्या वतीने आणखी १७ रस्ते सुधारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. रस्ते सुधारण्यासाठी पथ विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. त्यामुळे आता यापुढील काळात अपवादात्मक परिस्थितीवगळता कोणालाही रस्तेखोदाईसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी जाहीर केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील सुस्थितीत असलेले रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. यामध्ये धायरी, मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या विजयानगर कॉलनी, पद्मावती परिसरासह शहरातील इतर भागांतील रस्त्यांचा समावेश आहे.
धायरी गावातून डीएसके विश्वकडे जाणारा रस्ता चार दिवसांपूर्वी तयार करून तेथे डांबरीकरण करण्यात आले होते. सोमवारी सकाळी हा रस्ता जेसीबीने खोदण्यास सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी या कामाबद्दल कामगारांकडे चौकशी केली असता, एका पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या स्वीय सहायकाचे काम आहे, अशी माहिती देण्यात आली. या ठिकाणी महापालिकेच्या पथ, मलनि:सारण विभागाचे अभियंते उपस्थित नव्हते.
पथ विभागाचे उपअभियंता नरेश रायकर, मलनि:सारण विभागाचे निशिकांत छापेकर, शुभम देशमुख यांच्याकडे याबाबत चौकशी करण्यात आली असता, हा रस्ता खोदण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. सदाशिव पेठेत विजयानगर कॉलनी येथे नव्याने तयार केलेला रस्ता खोदण्यात आला. हा रस्ता कोणी आणि कशासाठी खोदला याची कोणतीही माहिती पथ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती. हा रस्ता नक्की कशासाठी खोदला, याची माहिती त्या विभागातील कनिष्ठ अभियंता यांच्याकडून घेतली जाईल, असे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले.
रस्तेखोदाई करण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. बेकायदा रस्ते खोदल्यास खपवून घेतले जाणार नाही. यामध्ये सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाची तक्रार बांधकाम विभागाकडेदेखील केली जाईल. – अनिरुद्ध पावस्कर, मुख्य अभियंता, पथ विभाग