संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : ससून रुग्णालयातील कैदी पलायनप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अखेर बुधवारी पोहोचला. सरकारी कामकाजातील दिरंगाईमुळे समितीने अहवाल सादर केल्यानंतर तब्बल १३ दिवसांनी तो मंत्र्यांसमोर मांडण्यात आला. आता या अहवालावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती ११ ऑक्टोबरला नियुक्त केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर होते. ही समिती १५ दिवसांत चौकशी करून सरकारला अहवाल सादर करणार होती. समितीचे अध्यक्ष डॉ. म्हैसेकर यांनी १५ दिवस संपताच तातडीने २७ ऑक्टोबरला चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांना सादर केला.

आणखी वाचा-पुणे : चिमुकल्याची अवेळी जन्मापासून ३ महिने मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी!

हा अहवाल निवतकर यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे पाठवला जाणार होता. वाघमारे हे परदेश दौऱ्यावर होते. ते परतल्यानंतर ३ नोव्हेंबरला हा अहवाल त्यांच्यासमोर सादर करण्यात आला. नंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दौऱ्यावर होते. ते दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्याकडे अखेर बुधवारी अहवाल सादर करण्यात आला.

ससूनच्या चौकशीचा प्रवास

११ ऑक्टोबर – वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून चौकशी समिती नियुक्त

२७ ऑक्टोबर – चौकशी समितीकडून वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे अहवाल

३ नोव्हेंबर – वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडून वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे अहवाल

८ नोव्हेंबर – वैद्यकीय शिक्षण सचिवांकडून मंत्र्यांकडे अहवाल सादर

ससूनच्या चौकशीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे. अहवाल गोपनीय असल्याने त्यातील तपशील जाहीर करता येणार नाही. अहवाल तपासून मंत्री त्यावर कार्यवाही करतील. -दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against whom in sassoon case inquiry report is finally in the hand of the minister pune print news stj 05 mrj
Show comments