पुणे : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार घटनेनंतर संबंधित आगारप्रमुखांनी स्थानकाच्या परिसरातील खासगी बसचालक आणि रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, स्थानकाशेजारी असलेल्या रिक्षाथांब्यावरील रिक्षा थांबविण्यासही मज्जाव करण्यात येत असल्याने रिक्षाचालक आणि ‘एसटी’ महामंडळामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दरम्यान, याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून तोडगा निघाला नाही तर, बुधवारपासून (१२ मार्च) तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा या वेळी रिक्षाचालक संघटनेकडून देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस स्थानकांच्या २०० मीटर परिसरापर्यंत खासगी प्रवासी बसला आणि इतर वाहने उभे करण्यास मज्जाव आहे. परंतु, स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर स्वारगेट बस स्थानकात खासगी वाहनचालकांनी उच्छाद मांडला असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक आणि प्रवासी वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत असून ‘एसटी’ महामंडळाच्या बसला स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी आणि बाहेर पडताना कोंडीचा सामना करावा लागत असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले असल्याचे आगारप्रमुख पल्लवी पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.
त्यामुळे वाहतूक पोलिसांनी स्थानकातील रिक्षा बाहेर काढण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. तसेच महामेट्रोच्या कामामुळे रिक्षाचालकांचा मूळ थांबा हलवून सातारा रस्त्याकडील प्रवेशद्वाराजवळ देण्यात आला आहे. या ठिकाणी रिक्षा उभ्या असताना या चालकांवर कारवाई करण्यात येत असल्याने नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, स्वारगेट बसस्थानकाच्या सातारा रस्त्यावरील प्रवेशद्वाराजवळ रिक्षा उभ्या करण्यास तत्कालीन महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. नवीन ठिकाणी थांबा उभारण्यास आम्हाला जागा नाही, दूरच्या ठिकाणी रिक्षाथांबा गेल्यास महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांग प्रवाशांची फरपट होईल. रिक्षाचालकांच्या व्यवसायावर देखील परिणाम होईल, असे रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. – प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, ‘एसटी’ महामंडळ, पुणे</p>
स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात महामेट्रोचे काम सुरू आहे. हे काम संपेपर्यंत एका बाजूला रिक्षा थांबा कायम ठेवण्याबाबत परवानगी द्यावी. काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या पूर्वीच्या थांब्यावर रिक्षा उभ्या केल्या जातील. अशीच कारवाई सुरू राहिल्यास बुधवारपासून तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल. – बापू भावे, सल्लागार, स्वारगेट इन गेट एसटी स्टँड रिक्षा संघटना