बीआरटी मार्गातील वाहनांवरही कारवाई सुरू
गणेशोत्सवात पीएमपीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या एकूण एक हजार १७६ फुकटय़ा प्रवाशांवर पीएमपी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ५२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, निगडी ते दापोडी बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहन चालकांवर पीएमपी आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरु करण्यात आली असून गुरुवारी घुसखोरी करणाऱ्या ३५ खासगी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सवात पीएमपी प्रशासनाकडून जादा गाडय़ांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या जादा गाडय़ांच्या सेवेमुळे महामंडळाच्या तिजोरीत १५ कोटी ६३ लाख ३६ हजार २७० रुपयांचे उत्पन्न जमा झाले. या दरम्यान फुकटय़ा प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली होती. गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, वेस्टएण्ड, बंडगार्डन, वानवडी कॉर्नर, वसंतबाग, सातववाडी या भागात ही पथके कार्यरत होती. या पथकाने केलेल्या कारवाईत एक हजार १७६ फुकटय़ा प्रवाशांकडून ३ लाख ५२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी दिली.
पीएमपीकडून निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला आहे. या मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी होत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर पीएमपीकडून बीआरटी मार्गात येणाऱ्या खासगी वाहनचालकांवर कारवाई सुरु होती. मात्र आता वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई सुरु झाली आहे. बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या ३५ वाहनचालकांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली.
प्रवाशांना जलद, सुलभ, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होण्यासाठी बीआरटी मार्गावरील सेवा सुरु करण्यात आली आहे. रुग्णवाहिका सोडून अन्य खासगी वाहनांना या मार्गात प्रवेश करण्यास मनाई आहे. खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉडर्नही नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र वॉर्डनना शिवीगाळ करून, धमकावून बीआरटी मार्गातून खासगी वाहनांची वाहतूक सुरु असल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे. पीएमपी प्रशासनाकडून कारवाई होत असतानाही घुसखोरी होत असल्यामुळे कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता पोलिसांच्या धाकामुळे घुसखोरीला आळा बसेल, अशी आशा पीएमपी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यापुढे मार्गात नियमबाह्य़पणे वाहने चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.