पुणे : वाहतूक नियमभंग हाच ‘नियम’ असल्यासारखे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांच्या शहरात एखाद्याने किती वेळा नियमभंग करावा?… पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार तब्बल १५० वेळा! या दुचाकीस्वारावर थकीत असलेल्या दंडाची रक्कम आहे जवळपास सव्वा लाख रुपये. विशेष म्हणजे, दंडाची ही रक्कम ज्या दुचाकीवरून नियमभंग केले, त्या दुचाकीच्या किमतीच्या अडीचपट आहे!
पुणे शहरात वाहतूक नियमभंगाची चालकांची ‘हौस’ दांडगी आहे! रहदारीच्या एकेरी रस्त्यावर विरुद्ध दिशेने जाणे, हेल्मेट परिधान न करणे, सिग्नल मोडणे, दुचाकीवर तिघांनी बसून जाणे असे प्रकार तर सर्रास सुरू असतात. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. त्यात नुकतेच असे आढळले, की शहरातील एका दुचाकीस्वाराने १५० हून जास्त वेळा वाहतूक नियमांचा भंग केला आहे. वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला एक लाख २१ हजारांचा दंड ठोठावला आहे. त्याखालोखाल दोन वाहनचालकांनी १३० आणि ११६ वेळा वाहतूक नियमभंग केल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा >>>पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविलेल्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने घेतले दगडूशेठ गणपतीचं दर्शन
पावसाळ्यात शहरातील वेगवेगळ्या भागात कोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला आहे. वाहतूक पोलिसांसह पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करावी, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार, शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांवर वाहतूक कोंडी सोडविणे, तसेच वाहतूक सुधारणा करण्याचे काम करण्यात येणार आहे. महापालिका आणि पोलिसांनी एकत्र येऊन हे काम केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांची माहिती घेण्यात आली.
हेही वाचा >>>Swapnil Kusale : VIDEO: स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक पदक ठेवलं दगडूशेठ गणपतीच्या चरणी
बेशिस्तीचे ‘मानकरी’
वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी सर्वाधिक दंड झालेल्या वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांनी नुकतीच संकलित केली. त्यात समोर आलेली माहिती शहरातील बेशिस्त वाहतुकीचे अगदी नेमके दर्शन घडविणारी आहे.
– १०० पेक्षा जास्त वेळा नियमभंग केलेले वाहनचालक : २१
– ५० पेक्षा जास्त वेळा नियमभंग केलेले वाहनचालक : ९८८
– ९८८ वाहनांवर प्रलंबित दंड : तीन कोटी १८ लाख रुपये
दंड न भरल्यास वाहन जप्त; परवाना रद्द
थकीत दंड न भरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. आतापर्यंत पोलिसांनी ४४ वाहने जप्त केली आहे. वाहतूक शाखेतील प्रत्येक विभागाला याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. दंडाची रक्कम मोठी असताना दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांचा शोध घेण्यात येत आहे. वाहतूक नियमांचा सातत्याने भंग करणाऱ्या वाहनचालकांनी दंड न भरल्यास त्यांचा वाहनचालक परवाना रद्द केला जाणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महापालिका, वाहतूक पोलीस, तसेच विविध विभागांच्या समन्वयातून वाहतूकविषयक सुधारणांची कामे आणि कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
© The Indian Express (P) Ltd