पुणे : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकल्पातील सांडपाण्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत असल्याची बाबही समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला नोटीस बजावली आहे.

कुरकुंभ एमआय़डीसीतील जलप्रदूषणाचा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. एमआयडीसीतील सांडपाणी नाल्यांमध्ये जाऊन त्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याची तक्रार येथील नागरिक वारंवार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ही नोटीस बजावली आहे. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी २५ सप्टेंबरला कुरकुंभ एमआयडीसीला नोटीस बजावली आहे. त्यात एमआयडीसीतील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>कृषी सेवेच्या २५८ जागांसाठी एमपीएससीकडून अर्ज प्रक्रिया सुरू… काय आहे अंतिम मुदत?

नोटिशीमध्ये म्हटले आहे की, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी जमिनीत मुरणारे सांडपाणी रोखण्यासाठी एमआयडीसीने पुढील सात दिवसांत कृती आराखडा सादर करावा. याचबरोबर इतर संस्थांच्या मदतीने जल परीक्षण दर तीन महिन्यांनी करावे. एमआयडीसीने जुन्या जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या या वर्षाच्या अखेरपर्यंत बदलाव्यात. एमआयडीसीतील जलवाहिन्यांमध्ये गळती झाल्यास तिथून सांडपाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू शकण्याचा धोका आहे. त्यामुळे हे निर्देश देण्यात आले आहेत. उद्योगांमधून बाहेर पडणारे सांडपाणी रोखण्यासाठी एमआयडीसीने पावले उचलावीत. यात एमआयडीसीने समन्वय संस्था म्हणून काम करावे.

कुरकुंभ एमआयडीसीतील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन केल्याचा मासिक अहवाल एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा एमआयडीसीवर कायदेशीर कारवाई करण्याचे पाऊल उचलावे लागेल.- जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस मिळाली आहे. याआधीही मंडळाने नोटीस दिली होती. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. जुनी जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर सांडपाणी तपासणीही दरमहा केली जात आहे.- विजय पेटकर, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ