पिंपरीगाव येथे म्हाडाच्या जवळपास सात एकर जागेवर असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई सोमवारी मोठय़ा पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. कारवाई थांबवण्यासाठी नागरिकांनी विरोध केला, त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, म्हाडाने निर्धारपूर्वक कारवाई पूर्ण केली.
म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील पथक सकाळीच िपपरीत दाखल झाले. पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांचे पथक तैनात होते. मानवतेच्या दृष्टिकोनातून घरे पाडू नयेत, अशी विनंती रहिवाशांकडून करण्यात आली. मात्र, कारवाईवर ठाम असलेल्या म्हाडा प्रशासनाने जवळपास ३०० झोपडय़ा व घरांवरील कारवाई पूर्ण केली. तथापि, काही नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले होते. मूळ जागामालकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करून त्यांना मोबदला अथवा योग्य पर्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भाजप नेते अमर साबळे, माजी नगरसेवक दत्ता वाघेरे, रिपाइंचे गणेश शिर्के तसेच संदीप वाघेरे, दिलीप कुदळे आदींनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या संदर्भात, अमर साबळे यांनी सांगितले, मूळ जागामालकांना योग्य तो मोबदला तसेच म्हाडात सवलतीच्या दरात घरे देण्याविषयी म्हाडा प्रशासनाने कोणतीही चर्चा केली नाही. अनेक लोक बेघर झाले आहेत, त्यादृष्टीने विचार झाला पाहिजे.

Story img Loader