बेकायदेशीरपणे लोहमार्ग ओलांडणाऱ्या सहा हजार ९८ प्रवाशांवर गेल्या वर्षभरात रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रवाशांकडून सात लाख २६ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.
चुकीच्या पद्धतीने रेल्वे लोहमार्ग ओलांडताना होणारे अपघात लक्षात घेता रेल्वेच्या वतीने याबाबत विशेष अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पादचारी पूल असतानाही अनेक प्रवासी वेळ वाचविण्यासाठी थेट लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. लोहमार्गावरून जाताना मोबाईलवरील संभाषण सुरू असते. अशा परिस्थितीत अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे याबाबत रेल्वेकडून सातत्याने प्रवाशांना सूचना करण्यात येतात.
मुख्य म्हणजे भारतीय रेल्वे अधिनियम १४७ नुसार बेकायदेशीरपणे लोहमार्ग ओलांडणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. हा गुन्हा करताना पकडले गेल्यास ५०० रुपये दंड किंवा सहा महिन्याच्या कैदेचीही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे दिलेल्या जागेतूनच लोहमार्ग ओलांडून रेल्वेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.