पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील दोन उद्योगी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नगररचना विभागातील भूमापक व प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक नगररचनाकार यांच्यावर कारवाई केली आहे.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील मशिन खरेदी प्रकरणातील गैरव्यवहाराचा ठपका ठेवून रुग्णालयाचे तत्कालीन भांडारपाल तानाजी लोखंडे व उपलेखापाल ज्ञानदेव गराडे यांना आयुक्तांनी निलंबित केले. रुग्णालयासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मशिनरीच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता, किमतीतील प्रचंड तफावत, अधिकारापेक्षा जास्त खरेदी, पदाचा गैरवापर या कारणांमुळे त्यांच्यावर कारवाई झाली. त्यापाठोपाठ आयुक्तांनी ताथवडे येथील रस्त्याविषयी दिलेल्या अभिप्रायावरून भूमापक नितीन जवळकर व सहायक नगररचनाकार संभाजी कांबळे यांना दोषी धरले आहे. जवळकर यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून कांबळे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.