शहरातील अनधिकृत जाहिरात फलक चोवीस तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यानंतर पुणे महापालिकेतर्फे अनधिकृत फलकांवरील कारवाई गुरुवारी सकाळी आठपासून सुरू केली जाणार आहे.
अनधिकृत जाहिरात फलकांबाबत न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीत राज्यातील मुख्य शहरांमधील (पुण्यासह) सर्व अनधिकृत जाहिरात फलक काढण्याची कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याची माहिती महापालिकेचे वकील अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी प्रशासनाला सायंकाळी दिली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने गुरुवार सकाळी आठपासून ही कारवाई सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
महापालिकेचे सर्व सहायक आयुक्त तसेच क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई सुरू होईल. त्यासाठी आवश्यक असलेले बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, बहुउद्देशीय पथकातील कर्मचारी यांची मदत घेतली जाईल. तसेच यंत्रसामग्री वगैरेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या फलकांवर कारवाई केली जाणार आहे त्या फलकाचे कारवाईपूर्वीचे व कारवाईनंतरचे छायाचित्रही घेतले जाणार आहे. सायंकाळी सात पर्यंत ही माहिती अतिक्रमण विभागाकडे कळवावी असे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

Story img Loader