भोसरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार विलास लांडे यांच्या विरोधातील बंडखोर स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे तसेच, चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा उघड-उघड प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. लांडगे व जगतापांना साथ देणाऱ्या इतरांनाही दोन दिवसात अधिकृत उमेदवारांचा प्रचार सुरू न केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली आहे. या पक्षविरोधी कारनाम्यांचे चित्र उघडपणे दिसत असतानाही आतापर्यंत सबुरीने घेतलेल्या अजित पवार यांनी निवडणुकीला जेमतेम चार दिवस राहिले असताना कारवाईचा बडगा उगारल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी व धूसफूस मोक्याची क्षणी चव्हाटय़ावर आली आहे.
बंडखोरी करणारे महेश लांडगे, त्यांचा प्रचार करणारे नगरसेवक दत्ता साने तसेच, लक्ष्मण जगताप यांचा प्रचार करणारे नगरसेवक नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप, शत्रुघ्न काटे व शिक्षण मंडळाच्या उपसभापती सविता खुळे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांचे पद रद्द करण्याची शिफारस पक्षनेत्या मंगला कदम यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आझम पानसरे, हनुमंत गावडे, प्रभाकर वाघेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष टिकवण्यासाठी कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक होते. यातून इतरांना योग्य तो संदेश मिळेल, असे बहल म्हणाले.
महेश लांडगे यांच्या बंडखोरीला राष्ट्रवादीतील लांडे विरोधी नेत्यांचा छुपा आशीर्वाद आहे, हे उघड गुपित आहे. त्यामुळेच पदावर असताना बंडखोरी करूनही त्यांच्याविषयी स्थानिक नेते मूग गिळून बसले होते आणि अजितदादाही कसलेच भाष्य करत नव्हते. दुसरीकडे, भाजपची उमेदवारी स्वीकारलेल्या जगतापांचे राष्ट्रवादीतच राहिलेले समर्थक पक्षविरोधी काम करत असल्याने चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे अडचणीत आले होते. अजितदादांना शहरातील घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळत होती. तरीही त्यांनी सबुरीने घेतले होते. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अजितदादांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे राष्ट्रवादीतील राजकारण ढवळून निघाले आहे. या कारवाईनाटय़ाचे तीव्र पडसाद उमटणार, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
पक्षाच्या विरोधात काम करत असलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. याशिवाय, चिंचवड मतदारसंघात पक्षविरोधी काम करत असल्याबद्दल ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र गावडे, सरचिटणीस गजानन चिंचवडे, उपाध्यक्ष राजेंद्र चिंचवडे आणि प्रभाग अध्यक्ष पोपट भोंडवे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader