शाळा महाविद्यालयांसमोर थांबून मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर पिंपरी पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. कारवाईवेळी महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण थांबणाऱ्या २८ टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले आणि कायद्यानुसार कारवाई करुन नातेवाइकांसमोर समज देऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी पोलीस पथकासह बुधवारी सकाळी साडेदहा ते दुपारी एकपर्यंत चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालय, डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालय, संत तुकारामनगर, जयहिंद कॉलेज, नवमहाराष्ट्र महाविद्यालय पिंपरी आदी ठिकाणी कारवाई करण्यासाठी मोहीम राबविली. महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण थांबलेल्या २८ मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आणि मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई करुन नातेवाइकांच्या समोर समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले.

तसेच महाविद्यालय परिसरामध्ये बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या ३९ दुचाकींची यादी तयार करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी ती यादी वाहतूक विभागाकडे देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक कुबडे यांनी शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थिनीशी संवाद साधला आणि टवाळखोर मुलांच्या विरोधात न भिता तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.

गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक आयोजित करण्यात आली असून सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन कुबडे यांनी केले आहे.

त्यासाठी ९७६४१९७९७७ या क्रमांकावर किंवा ०२०-२७४७२२१८, २६२०९२१४ या पिंपरी पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीवर विद्यार्थिनींनी टवाळखोरांच्या विरोधात तक्रार द्यावी, असे प्रसिध्दीपत्रकातून कळवण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on tampering
Show comments