पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली आणि क्वीन्स शाॅप स्टोरी या हॉटेलवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ३ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.शिवाजीनगर भागातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली आणि क्वीन्स शाॅप स्टोरी या हॉटेलकडून अनधिकृत शेड घालण्यात आले होते. त्यानुसार बांधकाम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. बांबू आणि पत्र्यांच्या सहाय्याने बांधलेल्या शेडचा समावेश आहे. वैशाली हॉटेलमधील टेरेस आणि सामासिक अंतरातील सर्व विनापरवाना शेड कारवाई करून हटविण्यात आल्या. यावेळी पक्के उभारलेले शेड गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई
पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समीर गढई यांनी ही कारवाई केली. घरपाडी विभागाकडील दहा बिगारी, एक पोलीस गट या कारवाईत सहभागी झाला होता. हॉटेलकडून पुन्हा शेड उभारण्यात आली तर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुनील कदम यांनी दिली.