पुणे : राज्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी शाळांना ३० जूनपर्यंत करावी लागणार असूून, भाषा आणि गणित या विषयांसाठीच्या अध्ययन क्षमता साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. मूलभूत पातळीवरील वाचन, लेखन आणि अंकगणित याचे अध्ययन विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करणे आवश्यक ठरणार आहे. अभियानात विद्यार्थी पालक, शाळा, शिक्षक, समाज आणि शासकीय यंत्रणांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. त्यासाठीचा कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळा, तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांना लागू करण्यात आलेला आहे. नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्याचे ध्येय अभियानात ठेवण्यात आले आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात यात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या कालावधीत उन्हाळी सुटी येत आहे. त्यामुळे अध्ययनात मागे असणाऱ्या, तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलांसाठी शिक्षकांनी विविध ऑनलाइन, ऑफलाइन मार्गानी संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता प्राप्त केल्यावरच विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून संकेतस्थळावर कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे लागणार आहे. शिक्षकांनी स्वतः कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे कौतुक करण्यात येणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.