पुणे : ‘ईश्वरी (तनिषा) भिसे मृत्यूप्रकरणात आतापर्यंत राज्य आरोग्य विभाग, पुणे धर्मादाय आयुक्त आणि पुणे महापालिकेच्या माता-मृत्यू विभागाचे अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवालही लवकरच पाठवला जाईल. त्यानंतरच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याचा किंवा कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी पुण्यात दिले.

दरम्यान, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबद्दल आणि डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, दीनानाथ रुग्णालय स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत चाकणकर बोलत होत्या. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, पुणे शहर गुन्हे विभागाचे उपायुक्त निखील पिंगळे तसेच भरोसा सेलचे सदस्य उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या, ‘दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती ईश्वरी (तनिषा) भिसे मृत्यूच्या घटनेनंतर ससून रुग्णालयाच्या गठीत समितीची आज आढावा बैठक पार पडली. या समितीने केलेला अहवाल राज्य सरकारला रात्री उशिरापर्यंत सादर करण्यात येणार आहे. मात्र, भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत, संबंधितांना चांगली जरब बसावी म्हणून कठोर कारवाई करण्याचा आपला प्रयत्न आहे. कोणतेही शासकीय किंवा खासगी रुग्णालय असो, त्यांना शिस्त आणि जरब आणण्यासाठीचा हा प्रयत्न असेल.’

अत्याचाराच्या घटनेत पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीला कोण कोण उपस्थित होते, महिलेची तपासणी कोणी करावी, या अनुषंगाने समितीने पडताळणी केली आहे. समितीने नियमावली सादर केली असून, अधिष्ठाता, पोलीस प्रतिनिधी, स्त्री-रोग तज्ज्ञ, न्याय वैद्यकीय विभागाचे प्रमुख आणि शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख उपस्थित राहावे, असे अहवालात नमूद केले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

संबंधित प्रकरणानंतर पोलिसांकडून पत्र प्राप्त होताच समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल पूर्णत्वाच्या दिशेने असून, रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. ससूनची समिती उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला आहे किंवा नाही एवढेच पाहते. त्यासाठी सर्व कागदपत्रे आम्ही तपासून पाहिले आहेत.- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय