पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी न भरणाऱ्या ‘सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’वर (एसटीईएस) महापालिकेने कारवाई केली आहे. संस्थेच्या वडगाव आणि कोंढवा येथील एकूण १२८ मिळकतींना मिळकतकर विभागाने टाळे ठोकले आहे. या संस्थेकडे ३४५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
महापालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे २० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अधिकाधिक थकबाकी वसूल करण्याचा निर्णय महापालिकेच्या मिळकत कर विभागाने घेतला आहे. यासाठी विशेष पथकांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. मिळकतकराची थकबाकी असलेल्या सिंहगड संस्थेच्या एरंडवणे येथील मुख्यालयाला टाळे ठोकून महापालिकेने डिसेंबर २०२४ मध्ये नोटीस चिटकवली होती. त्यानंतरही संस्थेने थकबाकी भरलेली नाही.
‘एसटीईएस’च्या वडगाव बुद्रुक येथे ४३ इमारती असून, संस्थेच्या येथील मुख्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. येथील एकूण १९८ कोटी ६१ लाख रुपये मिळकतकर थकित आहे. एरंडवणा येथील मिळकतीचे ४७ कोटी ४३ लाख रुपये थकित आहेत. तर कोंढवा बुद्रुक येथील सहा मिळकतींची २० काेटी ५० लाख रुपये इतकी थकबाकी आहे, असे मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या शहरातील विविध भागात मिळकती आहेत. या मिळकतींच्या करासंदर्भात महापालिका व सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये न्यायालयात वाद सुरू आहेत. संस्थेच्या १२८ मिळकतींचा तब्बल ३४५.४३ कोटी मिळकत कर थकलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने ज्या मिळकतीसंदर्भात न्यायालयाचे आदेश नाहीत, अशा मिळकतींवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यापूर्वी एरंडवणा येथील संस्थेचे मुख्य कार्यालय ४७.४३ कोटीच्या थकबाकीपोटी महापालिकेने सील केले आहे. लवकरच या मिळकतीच्या लिलावाची प्रक्रीया सुरू करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आवाज उठवला. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली. टाळे ठोकलेल्या मिळकतींच्या माध्यमातून किती थकबाकी वसूल झाली, याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी द्यावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे.
शंभर थकबाकीदारांकडे तब्बल ३३४ कोटींची थकबाकी
शहरातील सर्वाधिक थकबाकीदार असलेल्या १०० मिळकत धारकांची यादी महापालिकेच्या मिळकतकर विभागाने तयार केली आहे. या १०० थकबाकीदारांकडे महापालिकेची तब्बल ३३४.१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. सर्वाधिक कर थकबाकी फुरसुंगी भागातील असून ती १८ कोटी ४४ लाख ३७ हजार ५८५ रुपये इतकी आहे. तसेच या यादीमध्ये शहरातील अनेक नामांकित संस्था आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे.