पुणे : शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुंडाला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
प्रथम उर्फ आकाश तुळशीदास विटकर (वय २२, रा. मारुती मंदिरामागे, वडारवाडी, शिवाजीनगर) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. विटकर याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, दगडफेक करून दहशत माजविणे तसेच बेकायदा शस्त्र बाळगणे, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. त्याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक अंकुश चिंतामण आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या (पीसीबी) पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी तयार केला होता.
हेही वाचा – पुणे : मोबाईल गेम खेळण्याच्या आमिषाने अल्पवयीन मुलावर अत्याचार; एकाविरुद्ध गुन्हा
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. विटकर याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून, पोलीस आयुक्तांनी शहरातील आठ गुंडांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे.