पिंपरी: महापालिकेने शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, संस्थात्मक, वैद्यकीय मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण हाती घेतले. मात्र, व्यावसायिक आस्थापनांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामध्ये ४३ हजार ९२५ आस्थापनांनी अपूर्ण माहिती सादर केल्याचे समोर आले आहे. अग्निसुरक्षेविषयी उपाययोजना नसणाऱ्या आस्थापनांचे नळजोड तोडणे, मालमत्ता लाखबंद (सील) करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहरात ९० हजारांहून अधिक व्यावसायिक आस्थापना आहेत. अग्निसुरक्षा नियमांचे बळकटीकरण आणि काटेकोर पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महापालिकेने महिला बचत गटांच्या मदतीने शहरात सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणादरम्यान व्यावसायिक आस्थापनांनी परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले होते. मात्र, माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. शहरातील ४३ हजार ९२५ व्यावसायिक आस्थापनांनी अग्निसुरक्षा उपायांबाबत अपूर्ण माहिती सादर केली असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेने या आस्थापनांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर लिंक पाठविली असून, त्याद्वारे आवश्यक माहिती संबंधित आस्थापनांनी त्वरित भरण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.

हेही वाचा… रब्बी हंगामातील पेरण्या अकरा टक्क्यांनी घटल्या ; जाणून घ्या पेरण्यांमध्ये घट होण्याची कारणे

याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, की आग प्रतिबंधक उपायांमधील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. अग्निसुरक्षा उपायांचे पालन आस्थापनांनी केले पाहिजे. सर्व आस्थापना आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन करतात किंवा नाही याची खात्री सर्वेक्षणाद्वारे केली जात आहे. सर्वेक्षणामध्ये काही आस्थापनांनी अपूर्ण माहिती दिली असल्याचे आढळून आले. या आस्थापनांनी आवश्यक माहितीची पूर्तता करणे गरजेचे आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अग्निसुरक्षा पायाभूत सुविधांचे मूल्यांकन होणार आहे. व्यावसायिक आस्थापना मालक आणि भोगवटादारांनी परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले की, अग्निसुरक्षेविषयी सूचनांचे पालन करण्यास टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांची व्यावसायिक आस्थापना लाखबंद करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will be taken against 43 thousand establishments for incomplete information on fire prevention measures pimpri pune print news ggy 03 dvr
Show comments