पुणे : शहरात आता दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. नाकाबंदीसाठी शहर, उपनगरातील २७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह १२५ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. बेशिस्त वाहनाचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>शिरूरमधील लढत दोन ‘राष्ट्रवादीं’मध्ये?
‘विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुुरुवात झाली आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचे वाहन जप्त केले जाणार आहे,’ असे अमितेश कुमार यांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे.
हेही वाचा >>>‘सारथी’च्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची निवडयादी कधी जाहीर होणार?
तपासणी झाल्यानंतर ब्रेथ ॲनलायझरची नळी नष्ट
मद्यपी वाहनचालकांची तपासणी ब्रेथ ॲनलायझर यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. या यंत्राला लावण्यात आलेली नळी संशयित वाहनचालकाची तपासणी केल्यानंतर बदलली जाणार आहे. वापरलेली नळी नष्ट केली जाईल. त्यामुळे वाहनचालकांकडून स्वच्छतेबाबत केल्या जाणाऱ्या तक्रारींना आता वाव राहणार नाही, तसेच संसर्गाची शक्यता राहणार नाही.