पुणे : शहरात बांधकामे करत असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत अनेक बांधकाम व्यावसायिक काम करीत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. नियमांचे पालन न करता केल्या जाणाऱ्या या बांधकामांमुळे वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या संघटनेला नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. शहरात सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषण वाढले असून आरोग्याला घातक सूक्ष्म धुलिकणांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

हेही वाचा – पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी

या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारद, बांधकाम साहित्य तसेच राडारोड्याची वाहतूक करणारे व्यावसायिक यांना ई-मेलच्या माध्यमातून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी बांधकाम व्यावसायिकांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर नियमभंग झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा – थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता?

बांधकामांमुळे शहरात वाढलेले धोकादायक धुलिकणांचे प्रमाण लक्षात घेत महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी बांधकाम व्यावसायिकांसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचीच नियमावली लागू केली आहे. यामध्ये बांधकामाच्या सीमाभिंतीला २५ फूट उंचे पत्रे उभारणे, बांधकाम सुरू असलेले ठिकाण हिरव्या कापडाने झाकणे, त्यावर पाणी मारणे, धूळ उडणार नाही, याची काळजी घेणे, राडाराेडा वाहतूक करताना ताे झाकून न्यावा, अशा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करत शहरात बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्याने बांधकाम विभागाने हे पाऊल उचलले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will be taken against pune builders air pollution problem pune print news ccm 82 ssb